news
clock

चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ३२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

पिंपरी, ता. १६ - चाकणमध्ये येथे भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ३२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची भयावह घटना घडली आहे. कुत्र्यांनी लचके तोडल्याने ही महिला फक्त १५ मिनिटांतच जिवाला मुकली आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास आंबेठाण चौक परिसरात घडली.  शोभा विजय वाघमारे असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्वरीत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

चाकणमध्ये राहात असलेल्या  शोभा वाघमारे सोमवारी मध्यरात्री आंबेठाण चौकातील उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोडने जात असताना सहा ते सात भटक्या कुत्र्यांनी त्यांना घेरले. अचानक झालेल्या या हल्ल्यात कुत्र्यांनी त्यांच्यावर झडप घातली. कुत्र्यांनी त्यांच्या हात, पाय, तोंड आणि मानेवर गंभीर चावे घेतल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या भीषण हल्ल्यात अवघ्या १५ मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला.

 सकाळी विवस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात सुरुवातीला खून किंवा अत्याचाराचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर कुत्र्यांच्या हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. शोभा यांनी दगड उचलून कुत्र्यांना पळवून लावण्याचा आणि स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्यांच्या झुंडीसमोर त्यांचा निभाव लागला नाही, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories