महिला पोलीस अंमलदाराला शिवीगाळ आणि धमकी; दोघांविरोधात गुन्हा दाखल

महिला पोलीस अंमलदाराला शिवीगाळ आणि धमकी; दोघांविरोधात गुन्हा दाखल

आळंदी | 16 सप्टेंबर 2026 : राँग साइडने येणाऱ्या तसेच वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी नियुक्त असलेल्या महिला पोलीस अंमलदाराला अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार आळंदीतील देहूफाटा चौकात घडला. राँग साइडने वाहन का घेऊन जात आहात, अशी विचारणा केल्यानंतर हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिघी-आळंदी वाहतूक विभागात महिला पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. घटना 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास देहूफाटा चौक, आळंदी, ता. हवेली, जि. पुणे येथे घडली.

आरोपी तेजस रविंद्र ताम्हाणे (वय 19)आणि सुजाता रविंद्र ताम्हाणे (वय अंदाजे 42, दोघे  रा. ज्ञानराज कॉलनी, काळे कॉलनी नं. 3, चऱ्होली बुद्रुक, पुणे) अशी आहेत.

फिर्यादी राँग साइडने येणाऱ्या तसेच विशेष मोहिमेअंतर्गत वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाई करत होत्या. यावेळी आरोपी राँग साइडने वाहन घेऊन जात असल्याचे आढळले.

फिर्यादीने आरोपींना राँग साइडने गाडी का घेऊन जात आहात, अशी विचारणा केली. त्यावर आरोपींनी फिर्यादीला अश्लील भाषेत शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच विनापरवाना राँग साइडने बेदरकारपणे वाहन चालविल्याचेही पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 578/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 221, 296, 352, 351(2) आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना बीएनएसएस कलम 35(3) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories