टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, पत्नी व लहान मुलगा जखमी
पिंपरी, ता. २४ - पुणे- नाशिक महामार्गावर वाकी भाम येथे रविवारी (ता. २२ मार्च) रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून महिला व सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांचे पती हेमंत साबळे हे मुलगा हिमांशु (वय ६) हे अॅक्टिवा दुचाकीवरून खेडकडून चाकणकडे जात होते. त्यावेळी समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या टाटा टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात तुळशी हॉटेलसमोर (ता. खेड) घडला.
या धडकेत हेमंत साबळे यांचा मृत्यू झाला, साबळे यांची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी टेम्पो चालक आरोपी राजन संजय जाधव (रा. राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.