मोशी | २४ सप्टेंबर २०२६ : गैरकायद्याची मंडळी जमवून एका ३२ वर्षीय व्यक्तीसह त्याची आई, वडील, भाऊ आणि बहिणीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मोशी प्राधिकरणातील जळवायू विहार येथे घडली. या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्यात टणक वस्तूने मारून जखमी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आदिनाथ गर्जे (वय ३२, मोशी प्राधिकरण, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास जळवायू विहार येथे घडली.
याप्रकरणी ज्ञानेश्वर श्रीराम खाडे (वय ५३), वैभव ज्ञानेश्वर खाडे (वय २७), भाग्यश्री गणेश गर्जे (वय २८), संकेत बजरंग लामण (वय २७), महेश शिवाजी खाडे (वय २९) आणि आर्यन राम खाडे (वय २२, सर्व रा. गेवराई, बीड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवली. त्यानंतर फिर्यादी तसेच त्यांची आई, वडील, भाऊ आणि बहीण यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी ज्ञानेश्वर खाडे यांनी कोणत्यातरी टणक वस्तूने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सावरे पुढील तपास करत आहेत.