हायवाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी!

हायवाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी!

दिघी | २४ सप्टेंबर २०२६ : कामावर जात असलेल्या दोन मित्रांच्या दुचाकीला भरधाव हायवाने पाठीमागून धडक दिल्याने २७ वर्षीय तरुण जखमी झाला, तर त्याच्या ३० वर्षीय मित्राचा मृत्यू झाल्याची घटना दिघी परिसरात घडली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात हायवा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज युवराज चिकटे (वय २७,आमंत्रण कॉलनी, भोसरी, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. किनवटखेड, ता. लातूर, जि. चाकूर) यांनी फिर्याद दिली आहे.

ही घटना २४ सप्टेंबर रोजी सकाळी पाचच्या सुमारास वडमुखवाडी येथील पेट्रोल पंपासमोर घडली. फिर्यादी आणि त्यांचा मित्र विशाल चौगुले (वय ३०, रा. विश्रांतवाडी, पुणे) हे जेवण करून फिर्यादीच्या मोटारसायकलवरून परत कामावर जात होते.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, ते मोटारसायकल चालवत असताना पाठीमागून आलेल्या हायवा क्रमांक एमएच १४ एनपी ३२९२ च्या चालकाने निष्काळजीपणे आणि हयगयीने वाहन चालवत दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात धीरज चिकटे यांच्या उजव्या हाताला, पायाला आणि डोक्याला दुखापत झाली.

दुचाकीवर मागे बसलेले विशाल चौगुले यांचा या अपघातात मृत्यू झाला, तर मोटारसायकलचेही नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी टेम्पो चालक नमे कैलास नारायण एडके (वय २६, रा. मोहननगर, गोडाऊन चौक, भोसरी; मूळ रा. वाणी पिंपळगाव, ता. पालम, जि. परभणी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिघी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories