पिंपरीत जुन्या भांडणातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याच्या उलट्या बाजूने वार!

पिंपरीत जुन्या भांडणातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याच्या उलट्या बाजूने वार!

पिंपरी | २४ सप्टेंबर २०२६ : मागील वर्षी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून २० वर्षीय तरुणाला शिवीगाळ आणि धमकी देत लोखंडी कोयत्याच्या उलट्या बाजूने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना पिंपरीतील मी इंदिरानगर येथील मोकळ्या मैदानात घडली. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन विल्सन मोथकुरी  (वय २०,रा. इंदिरानगर डबल ट्री हॉटेलच्या पाठीमागे, पिंपरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २३ सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी करण कोलांटी (वय २२) आणि अभि कोलांटी (वय २१, दोघे रा. रुपीनगर, चिखली, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, दोन्ही आरोपी फिर्यादीजवळ आले. त्यावेळी त्यांनी “मागच्या वर्षी तुझ्या मामाशी मुलासोबत भांडण झाले होते, त्याला खूप मस्ती आहे. तो कुठे आहे? तुम्ही आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशन येथे तक्रार देता का?” असे म्हणत वाद घातला. त्यानंतर करण कोलांटी याने फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

फिर्यादीने शिवीगाळ करू नको, असे सांगितल्यानंतर करण याने फिर्यादीच्या शर्टची कॉलर पकडून धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याचवेळी अभि कोलांटी याने त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याच्या उलट्या बाजूने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories