पारवा पकडण्यासाठी तारेचा फासा लावल्याच्या कारणावरुन तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण
पिंपरी, ता. २३ - पारवा पकडण्यासाठी तारेचा फासा लावल्याच्या कारणावरुन एका ३३ वर्षीय तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना साई पार्क, डुडुळगाव येथे मंगळवारी (ता. २१) घडली आहे. आरोपीला दिघी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत, मारहाण झालेला तरुण मिथुन बिरसिंग राठोड (वय ३३ वर्ष, मजुरी, रा. मोशी, आळंदी रोड) याने पोलिसांत तक्रार दिली आहे. आरोपीज्ञानेश्वर अशोक कव्हर (रा. डुडुळगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा फिर्यादीच्या तोंडओळखीचा आहे. पारवा पकडण्यासाठी तारेचा फासा लावला असल्याचे कारणावरुन आरोपीने लाकडी दांडक्याने फिर्यादी मिथुनच्या उजव्या हाताच्या मनगटावर व डाव्या पायाचे गुडघ्यावर मारहाण केली. त्यात मिथुन गंभीर जखमी झाला.
आरोपीविरोधात बुधवारी (ता. २२) दिघी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.