news
clock
देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार, हवामान विभागाची माहिती

देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार, हवामान विभागाची माहिती

देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार, हवामान विभागाची माहिती

पुणे, ता. १५ -   यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनावेळी 'एल-निनो' या तापमान वाढीच्या स्थिती तयार होण्याची शक्यता असल्याने देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक तफावतीची शक्यता धरण्यात आली आहे. 

नवी दिल्ली येथे नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मॉन्सून हंगामातील पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. हा अंदाज वर्तविताना प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान, भारतीय महासागरातील द्वि-ध्रुवीता आणि उत्तर गोलार्धातील हिमाच्छादन याचा अभ्यास करण्यात आला. यंदाच्या मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (६६ टक्के), सरासरीइतक्या पावसाची शक्यता २७ टक्के आहे.  सरीसरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता अवघी सात टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले, असे डॉ. महापात्रा यांनी सांगितले. 

  मे अखेरीस हवामान विभागनिहाय सुधारित अंदाज जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात १०५ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात देशात सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक, तर महाराष्ट्रात २० टक्के अधिक पाऊस पडला होता, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories