औंधमधील श्री शिवाजी विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला लेझर प्रिंटर, स्कॅनर व झेरॉक्स मशीन भेट
औंधमधील श्री शिवाजी विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला लेझर प्रिंटर, स्कॅनर व झेरॉक्स मशीन भेट
औंधमधील श्री शिवाजी विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
पिंपरी, ता. १५ - औंध येथील जनता शिक्षण संस्था संचलित श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या सन २००२-०३ च्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेप्रती असलेले नाते अधिक घट्ट करत माजी विद्यार्थ्यांनी शाळेला सुमारे 50,000 रुपये किंमतीचा लेझर प्रिंटर, स्कॅनर व झेरॉक्स मशीन भेट दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन, शिववंदना सादरीकरण, सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला विद्यमान प्राचार्य श्री नवले रवींद्रनाथ शिवराम, उपप्राचार्य श्री चव्हाण विठ्ठल नारायण, पर्यवेक्षिका स्वाती देशमुख, माजी प्राचार्य जे. बी. जकाते, जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व माजी प्राचार्य नंदकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोप देऊन करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अनेक माजी विद्यार्थी चिपळूण, नाशिक, सासवड, बारामती, मुंबई आदी ठिकाणांहून आवर्जून उपस्थित राहिले. एकूण सुमारे 120 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती23 वर्षांनंतर एवढ्या मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी एकत्र येण्याचा सर्वांनाच आनंद झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संगीता मनाळे, ज्योती गडेराव आणि माधुरी वायदंडे यांनी केले. स्वागत गीत संदीप गुरव, रुक्मिणी सुर्वे आणि ज्योती भोसले यांनी सादर केले. अॅड. अब्दुल ढाले, स्वाती घायाळ आणि नेहा गोळे या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षिका स्नेहलता जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले. सहयोगी प्राध्यापक डॉ. मल्हारी नागटिळक यांनी आभार मानले.