राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांत स्थापन होणार.. 'विशेष बाल पोलिस पथक कक्ष'
पुणे, ता. २३ - राज्यातील बालकांच्या संरक्षणासाठी रेल्वे पोलिस स्थानकासह सर्व पोलिस स्थानकातील कार्यालयांमध्ये ‘विशेष बाल पोलिस पथक कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी दिले आहेत. राज्य बाल हक्क आयोगाची नव्याने समिती स्थापित करण्यात आली असून, राज्यातील बालकांना सुरक्षा देण्याच्या दृष्टीने नुकत्याच झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
यामध्ये, हा कक्ष बालस्नेही स्वरूपाचा असावा, जेणेकरून बालकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि अनुकूल वातावरणात संवाद साधता येईल. हा कक्ष कार्यालय परिसरात सहज दिसेल अशा ठिकाणी उभारण्यात यावा व माहिती देणारे स्वतंत्र फलक लावण्यात यावे. सक्षम पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करून तेथे विशेष बाल पोलीस पथक कार्यरत ठेवण्यात यावे. प्रत्येक पोलीस ठाण्यात नियुक्त बाल कल्याण पोलीस अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक स्पष्टपणे दर्शविणे बंधनकारक आहे, अशा सूचना संजय पुराणिक यांनी दिल्या आहेत.