लग्नसमारंभात किरकोळ कारणावरुन फेटा व्यावसायिकाने ६० वर्षीय भटजींना जबर मारहाण
Apr 23 2026
47
लग्नसमारंभात किरकोळ कारणावरुन फेटा व्यावसायिकाने ६० वर्षीय भटजींना जबर मारहाण
पिंपरी, ता. २३ - लग्नसमारंभात किरकोळ कारणावरुन फेटा व्यावसायिकाने ६० वर्षीय भटजींना जबर मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी (ता. २१) सायंकाळी सातच्या सुमारास आळंदी येथील कुलवधू मंगल कार्यालयात घडला.
याबाबत, भटजी मधुकर लक्ष्मण पांडे (वय ६० वर्षे, ब्राम्हण रा. केळगाव ता.खेड) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी गणेश लक्ष्मण दाभेकर (रा. नगाजीमहाराज धर्मशाळा, गोपाळपुरा, आळंदी) याच्यावर आळंदी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. २२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नसमारंभ पार पडल्यावर आरोपी गणेश याने फिर्याद भटजी मधुकर पांडे यांनी म्हटले की, ''लग्न झाल्यानंतर लगेच नवरदेवाचा फेटा का काढला ? तुम्ही फेटा काढल्यामुळे मला नवरदेवाकडील लोकांनी कमी पैसे दिले.'' चिडून आरोपीने भटजींना सार्वजनीक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. लाथाबुक्क्यांनी भटजींना डोक्यावर, पोटावर, दोन्ही हातावर मारहाण करुन जमीनीवर पाडले त्यामधे भटजींचे उजव्या हाताच्या मनगटाला मोठी दुखापत झाली आहे.
आरोपीविरोधात आळंदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २९६, ११७ (२), ११५ (२), ३५२, ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.