पिंपरी-चिंचवड : आकुर्डी येथे कंटेनरची धडक बसून डिलिव्हरीबॉयचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कंटेनर चालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंटेनर मागे घेताना चालकाने रहदारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. निगडीहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील ग्रेड सेपरेटरमध्ये हा अपघात झाला. अंकित मगर असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून त्याचे वडील अशोक उत्तम मगर यांनी निगडी पोलिसांत या अपघाता प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकित झेप्टोची डिलिव्हरी करण्यासाठी दुचाकीवरून निगडीहून पिंपरीकडे निघाला होता. यावेळी बजाज ऑटोसमोरील ग्रेड सेपरेटरमध्ये चालक कंटेनर मागे घेत असताना त्याच्या दुचाकीला धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने अंकितचा मृत्यू झाला आणि दुचाकीचेही नुकसान झाले.
या घटनेनंतर अंकितचे वडिल अशोक मगर यांनी पोलिसांत तक्रार देत चालकाने कंटेनर निष्काळजीपणे चालवल्याचा आरोप केला आहे. धडकेनंतर जखमीला मदत न करता चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी कंटेनर चालक प्रदीप उदेशराम कुमार (वय २८) याच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात १५ नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुटे करत आहेत.