आद्य क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने तीन दिवसीय क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवडच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या पर्वाला पद्मश्री दादा इधाते यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी लहूजी वस्ताद यांच्या ऐतिहासिक कार्याचा आणि सामाजिक परिवर्तनातील योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी पद्मश्री दादा इधाते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेल्या कार्याला आद्य क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांनी संरक्षण आणि पाठबळ दिले. तसेच क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि लोकमान्य टिळक यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या जडणघडणीतही लहूजी वस्ताद यांचे मोलाचे योगदान होते, असे प्रतिपादन इधाते यांनी केले.
लहूजी वस्ताद यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणत स्वातंत्र्य आणि सामाजिक समतेच्या विचारांसाठी कार्य केले. त्यांच्या कार्यामुळे अनेक क्रांतिकारक आणि समाजपरिवर्तनाचे नेतृत्व करणारी माणसे घडली. यामुळेच त्यांना 'आद्य क्रांतिगुरू' असे संबोधले जाते. अशा महापुरुषांचे कार्य आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी जयंती आणि विचार प्रबोधन पर्व मोठ्या प्रमाणात आयोजित होणे आवश्यक आहे, इधाते म्हणाले.
या कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, आमदार महेश लांडगे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, जेजुरी संस्थानचे मुख्य विश्वस्त अनिल सौंदंडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संदीपान झोंबाडे, भाऊसाहेब अडागळे, नाना कांबळे, संजय धुतडमल, नितीन घोलप, युवराज दाखले, उत्तम सकटे, मारुती सोनटक्के, सतीश भवाळ, संजय ससाणे, सुनील भिसे, भगवान शिंदे, विशाल कसबे, बाळासाहेब रसाळ, प्रसाद केसरे, बाळासाहेब खंदारे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
विचार प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवशी निलेश देवकुळे यांनी प्रबोधनात्मक गीतगायन सादर केले. त्यानंतर बापू पवार यांनी 'लेखणीचा बादशहा' हा कार्यक्रम सादर केला. सायंकाळच्या सत्रात अनिकेत जवळेकर यांच्या प्रबोधनात्मक गीतगायनाचा कार्यक्रम झाला. तर शाहीर शैलेश लोखंडे यांनी 'देशभक्तिपर गीते, अभिमान महाराष्ट्राचा' या कार्यक्रमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. महापुरुषांचे कार्य, त्यांचे विचार आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश प्रबोधन गीतांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.