'डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे'कडून तरुणाईसाठी मोफत कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी नोंदणी सुरु
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे'कडून तरुणाईसाठी मोफत कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरु
पिंपरी, ता. १३ जुलै २०२६ - 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे'कडून (बार्टी) राज्यभरात अनुसूचित जातीच्या तरुण-तरुणींसाठी मोफत ५० प्रगत कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. जनरेटिव्ह एआय, सायबर सुरक्षा, मशीन लर्निंग, ई-व्हेईकल प्रॉडक्ट डिझाइन, फिनटेक ऑपरेशन्स यांसारख्या अत्याधुनिक अभ्यासक्रमांचा यात समावेश असून, प्रवेशासाठी १६ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे आणि कौशल्य विकास विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली ही राज्यव्यापी योजना राबविली जात आहे. उच्च तंत्रज्ञान अभ्यासक्रमांसह आठवी व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सीएनसी ऑपरेटर, इंडस्ट्रियल वेल्डिंग यांसारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रशिक्षणासाठी टाटा स्ट्राइव्ह, टेक महिंद्रा फाउंडेशन, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, सिम्बायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी आदी नामांकित संस्थांची निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षणादरम्यान बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य असेल. नियमित उपस्थित विद्यार्थ्यांनाच प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर सहा महिन्यांपर्यंत नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठीही सहाय्य केले जाणार आहे.
पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे प्रशिक्षण केंद्रे सुरू होणार असून, जागा मर्यादित असल्याने 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.barti.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.