भोंदू अशोक खरातच्या पोलिस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ
पुणे, ता. ३० - भोंदू अशोक खरातच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने रविवारी (ता. २९) त्याला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने खरातला १ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा निर्णय दिला.
नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केल्यानंतर सुनावणी पार पडली. विशेष तपास पथकाचे (SIT) तपास अधिकारी किरण सूर्यवंशी व पथकातील अधिकारी उपस्थित होते. तपास अधिकारी सूर्यवंशी यांनी आरोपी खरातला समक्ष घेऊन चौकशी करायची आहे असे सांगितले. या प्रकरणात काही 'कोडवर्ड' वापरले गेल्याचा संशय असल्याने त्यांचा उलगडा करण्यासाठी पुन्हा पोलिस कोठडीची मागणी केली. खरात तपासात सहकार्य करत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी बाजू मांडताना, अशोक खरात हा संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याची मांडणी केलीये. त्याचा मोबाईल डेटा तपासण्यासाठी, डमी नावे वापरुन लपवलेली संवेदनशील माहिती उघड करण्यासाठी आणि, जंगम मालमत्ता शोधण्यासाठी व अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी त्याला पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सांगितले. पिडीत महिलेचे वकील एम. वाय. काळे यांनीही गुन्ह्याचे स्वरुप गंभीर असल्याने तपास यंत्रणेला अधिक वेळ द्यावा, अशी विनंती न्यायालयाकडे केली. खरातचे वकील सचिन भाटे यांनी आणखी कोठडीची गरज नसल्याची मांडणी केली होती.
न्यायालयाने तपास अधिकारी व सरकारी वकीलांच्या मांडणीनुसार गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन भोंदू खरातच्या पोलिस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.