टाटा मोटर्स आयोजित समृद्ध हरित शाळा स्पर्धेत महापालिकेच्या शाळांची उत्तम कामगिरी
Mar 30 2026
11
टाटा मोटर्स आयोजित समृद्ध हरित शाळा स्पर्धेत महापालिकेच्या शाळांची उत्तम कामगिरी
पिंपरी, ता. ३० - टाटा मोटर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समृद्ध हरित शाळा स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांनी उत्तम कामगिरी केली. पिंपळे गुरव माध्यमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेत एकूण १५८ शाळा सहभागी झाल्या. विविध निकषांवर मूल्यमापन करुन अंतिम निकाल घोषित करण्यात आला.
महापालिका शाळांच्या गटात पिंपळे गुरव माध्यमिक शाळेने हरित उपक्रम, स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, ऊर्जा बचत आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग या बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करुन प्रथम क्रमांक मिळवला. 'पुनावळे मुले शाळा क्रमांक १०३'ने द्वितीय आणि 'पीसीएमसी पब्लिक स्कूल, कुदळवाडी क्रमांक ८९'ने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या शाळांना शाळांना अनुक्रमे सात लाख, चार लाख आणि दोन लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
या यशाबद्दल बोलताना शिक्षण समितीच्या सभापती रवीना आंगोळकर म्हणाल्या, ''महापालिका शाळांमध्ये मर्यादित साधनसामग्रीतही शिक्षक व विद्यार्थ्यांनी दाखवलेली ही जिद्द निश्चितच कौतुकास्पद आहे. ''
इतरांसाठी प्रेरणादायी ....
''समृद्ध हरित शाळा स्पर्धेतील महापालिका शाळांची कामगिरी अभिमानास्पद आहे. पर्यावरण संवर्धनासाठी शालेय स्तरावरच जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे. विजेत्या शाळांचे उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरतील.''
- ममता शिंदे, उपायुक्त, शिक्षण विभाग, महापालिका