बॅंकेने सील केलेल्या दुकानांचे सील तोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
भोसरी, ता. ९ - एम.आय.डी.सी. भोसरी येथील जयदिप बिझनेस सेंटर आपार्टमेंटमधील दोन दुकानांचे बँकेच्या ताब्यातील सील तोडल्याप्रकरणी तक्रार पोलिसांत नोंदविण्यात आली आहे. ही घटना २९ मार्च २०२६ ते ७ मे २०२६ दरम्यान घडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदिप प्रकाश पाटील (वय ४२, नोकरी, रा. स्वामी विवेकानंदनगर फेमस चौक, नवी सांगवी) यांनी डी.सी.बी. बँक लिमिटेड बँकेच्या वतीने तक्रार दिली आहे. आरोपी राजेंद्र आजीत सिंग सोहळ आणि त्याची पत्नी निलम राजेंद्र सोहळ यांनी कोर्ट कमिशनर आकाश कांबळे यांच्या न्यायालयीन आदेशानुसार सील केलेली शॉप नं. ०७ व ०८ तोडली आणि त्याठिकाणी नवीन कुलुप लावले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी शुक्रवारी (ता. ८) एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३२९(४), ३२४(४), ३(५)) गुन्हा नोंदविला आहे. आरोपींना अटक केलेली नाही.