भोसरी | २३ सप्टेंबर २०२६ : जेवण करून घरी परतणाऱ्या ३० वर्षीय तरुणाला दोन अनोळखी व्यक्तींनी अडवून दमदाटी करत त्याच्या खिशातील ३ हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना भोसरीतील सहल केंद्रासमोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपेंद्र बदामसिंग राजपूत (वय ३०, रा. लांडेवाडी चौक, एमआयडीसी भोसरी, पुणे; मूळ रा. समन्ना, ता. अमखेडा, जि. दमोह, मध्य प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना २२ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास भोसरी सहल केंद्रासमोरील रस्त्यावर घडली. फिर्यादी जेवण करून झोपण्यासाठी घरी जात असताना २० ते २४ वर्षे वयोगटातील दोन अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून त्यांना अडवले. दोघे फिर्यादीजवळ आले आणि “तू तुझ्याकडचे पैसे काढून ते सर्व आम्हाला दे”, असे म्हणत पैसे मागितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांनी त्यांना दमदाटी केली. त्यातील एकाने फिर्यादीचे दोन्ही हात पकडले, तर दुसऱ्याने त्यांच्या पँटच्या उजव्या खिशात ठेवलेले ३ हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत दोघेही तेथून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी तपास करत आदेश ज्योतीराम सुरवसे (वय १९, सध्या रा. संत तुकारामनगर, भोसरी, पुणे; मूळ रा. बामणी, पो. धानोरा, ता. निलंगा, जि. लातूर) याला अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.