चिखली | २३ सप्टेंबर २०२६ : स्वतःला अंमलबजावणी संचालनालय आणि सरकारी तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत ८५ वर्षीय निवृत्त आर्मी अधिकाऱ्याची १२ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकृष्ण ज्ञान शिंदे (वय ८५, सेवानिवृत्त आर्मी अधिकारी, रा. रुपीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत घडली. फिर्यादीच्या मोबाईलवर वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. त्यानंतर व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल करून आरोपींनी स्वतःला अंमलबजावणी संचालनालय आणि सरकारी तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवले.
आरोपींनी फिर्यादीला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा आभास निर्माण केला. या दबावाखाली फिर्यादीला JSM AGRO FARM PRIVATE LIMITED या नावाच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने संबंधित खात्यावर एकूण १२ लाख रुपये पाठवले. त्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(क) आणि ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक हसीना शेख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.