भोसरी : गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश मंडळांमध्ये बाल संरक्षण, बालहक्क आणि बालकांच्या सुरक्षिततेचा संदेश पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विशेष बाल पोलीस पथकाच्या ‘दिशा’ उपक्रमांतर्गत ‘बालस्नेही पिंपरी-चिंचवड अभियान’ राबविण्यात आले. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा उपक्रम घेण्यात आला.
या अभियानात लोंढे तालीम मित्र मंडळ-बापूजी बुवा चौक, साईनाथ तरुण मित्र मंडळ, पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळ-लांडगे आळी, जय हिंद तरुण मंडळ-कासारवाडी आणि कुंदननगर मित्र मंडळ-दापोडी या गणेश मंडळांमध्ये जनजागृती करण्यात आली.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या अभियानात होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनच्या समुदाय विकास विभागाचे सहव्यवस्थापक ऋषिकेश डिंबळे यांनी बालस्नेही शहर अभियानाची माहिती दिली. बालकांच्या संरक्षणासाठी उपलब्ध विविध यंत्रणा तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या ॲपबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
POCSO कायदा तज्ज्ञ सचिन करंजुले यांनी बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा, २०१२ (POCSO Act) याविषयी माहिती देत बालकांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांची भूमिका स्पष्ट केली.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनी बाल संरक्षण आणि बालसुरक्षेचा संदेश देणारे पथनाट्य सादर केले. या पथनाट्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाला भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी भेट देऊन अभियानाची माहिती घेतली आणि उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत गुरव आणि विशेष बाल पोलीस पथकाचे अमोल मुठे यांनी केले. यावेळी स्थानिक नागरिकांसह गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.