news
clock

पुनावळेत हायवा ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय मुलगा ठार; चालक अटकेत

पिंपरी, ता. १६ - पुनावळे येथे जांभेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अदिरा इंटरनॅशनल स्कूलसमोर भरधाव हायवा ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, दुसरा युवक किरकोळ जखमी झाला. ही घटना शनिवारी (ता. १४) रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत लक्षदीप दिलीप राठोड (वय १७ वर्षे ५ महिने) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्षदीप राठोड आणि त्यांचा मित्र स्वप्नील पिंटू चव्हाण (वय १५ वर्षे) हे दुचाकीवरुन घरी परतत होते. त्यावेळी अदिरा इंटरनॅशनल स्कूलसमोर भरधाव वेगात येणाऱ्या हायवा ट्रकने  त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात लक्षदीप राठोड यांना किरकोळ दुखापत झाली, तर स्वप्नील चव्हाण यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. जड वाहन वाहतुकीस निर्बंध असतानाही ट्रक बेदरकारपणे चालविल्याचा आरोप चालकावर आहे. या प्रकरणी ट्रक चालक समाधान रामदास माने (वय २७, रा. वराळे, ता. मावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे.

ट्रक चालक माने व  ट्रक मालक किरण मोहनराव काकडे (रा. तळेगाव दाभाडे) या आरोपींवर रावेत पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०५, १२५ (अ), १२५ (ब), २८१ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ व १३४/१७७ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ट्रकमालक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories