''वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसराचा विकास आराखडा रद्द करावा'' 'आरपीआय'चे नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांची सर्वसाधारण सभेत मागणी
Mar 14 2026
37
''वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसराचा विकास आराखडा रद्द करावा''
'आरपीआय'चे नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांची सर्वसाधारण सभेत मागणी
पिंपरी, ता. १४ - प्रभाग क्रमांक २५ मधील वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरात तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्याला (डीपी प्लॅन) 'आरपीआय'चे नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी विरोध दर्शवला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत डीपी प्लॅन तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
नगरसेवक कुणाल वाव्हळकर म्हणाले की, ''प्रारूप विकास आराखड्यात सर्वे क्रमांक १७६, १७७ आणि १७८ या ठिकाणी असलेल्या गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या घरांवरुन डीपी प्लॅन आखण्यात आला आहे. या निर्णयामुळे परिसरातील सुमारे हजार ते दीड हजार नागरिकांचे घरे धोक्यात येणार असून अनेक कुटुंबे बेघर होण्याची शक्यता आहे. हा डीपी प्लॅन तारांकित हॉटेलमध्ये बसून बनवलेला आहे. आराखडा तयार करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले गेले नाही. प्रशासनाने पूर्णपणे मनमानी कारभार केला आहे. ''
या आराखड्यामुळे सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर येण्याची वेळ येईल, त्यामुळे नागरिकांच्या हिताचा विचार करून हा डीपी प्लॅन तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.