हमीपत्र देऊनही पाणीपुरवठ्याची जबाबदारी टाळणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करावी, हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची मागणी
हमीपत्र देऊनही पाणीपुरवठ्याची जबाबदारी टाळणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करावी, हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची मागणी
पिंपरी, ता. १५ - शहरातील अनेक गृहरचना संस्थांमध्ये पाण्याचा खर्च सदनिकाधारकांना उचलावा लागत आहे. सन २०१९ पासून गृहरचना संस्थांनी विकत घेतलेल्या ण्याचा संपूर्ण खर्च संबंधित बांधकाम व्यवसायिकांकडून वसूल करण्याचे आदेश तातडीने द्यावेत, अशी मागणी पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
फेडरेशनने म्हटले आहे की, अनेक बांधकाम व्यवसायिकांनी गृहप्रकल्प सुरु करताना सोसायट्यांना स्वखर्चाने पाणीपुरवठा करण्याची लेखी हमी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात या हमीपत्राचे सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे आणि याचा आर्थिक फटका थेट रहिवाशांना बसला आहे. हा प्रश्न नागरिकांवरील आर्थिक अन्यायाचा गंभीर प्रकार आहे.
हमीपत्र देऊनही जबाबदारी न पाळणाऱ्या बिल्डरांना संरक्षण देणे म्हणजे नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणे होय. प्रशासनाने आता कठोर निर्णय घेतला नाही, तर ही प्रवृत्ती आणखी वाढेल. त्यामुळे हमीपत्राचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांविरोधात गुन्हे दाखल करावेत. तसेच भविष्यात अशा व्यावसायिकांना कोणतीही नवीन बांधकाम परवानगी किंवा पूर्णत्व प्रमाणपत्र देऊ नये.
याबाबत सांगताना पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले, ''सोसायटीधारकांनी 2019 पासून पाण्यासाठी भरलेला प्रत्येक रुपया हा त्यांच्या हक्काचा आहे. बांधकाम व्यवसायिकांनी दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन करुन नागरिकांवर अन्याय केला आहे. त्यामुळे हा संपूर्ण खर्च संबंधित बिल्डरांकडून वसूल करुन त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा, नागरिकांच्या हक्कांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल.''