कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी अंतिम निर्णय प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी, लवकरच कामाला सुरवात होणार
कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी अंतिम निर्णय प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी, लवकरच कामाला सुरवात होणार
पुणे, ता. १५ - कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाच्या अंतिम निर्णयाच्या प्रस्तावास राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्यास सुरुवात होणे बाकी आहे. भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे हा प्रकल्प रखडला होता.
कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयातून भूसंपादन प्रस्ताव तयार करण्यात आला. मंत्रालयातील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत तो मंजूर झाला. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या रस्त्यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
आता सरकारची औपचारिक मान्यता मिळताच प्रत्यक्ष जागा ताब्यात घेऊन रस्ता कामाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे आयुक्तांनी सांगितले.कात्रज-कोंढवा रस्ता विकास प्रकल्प ८४ मीटर रुंदीचा आहे. पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा मार्ग विकसित केला जाणार आहे असून, साडेतीन किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी १२९ मिळकतींमधील सुमारे ५२ हजार ६३० चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मुख्य रस्ता, दोन्ही बाजूंना सेवा रस्ते, पावसाळी वाहिनी विकसित होईल. माऊलीनगर येथे ग्रेड सेपरेटरचा समावेश असणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कात्रज-कोंढवा मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.