चाकण | १३ नोव्हेंबर २०२६ : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आगरकरवाडी परिसरात शेतीच्या वादातून एका ५० वर्षीय शेतकऱ्याला लाकडी फावड्याने मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यावेळी फिर्यादीच्या पत्नी आणि आईलाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास आगरकरवाडी येथील फिर्यादीच्या मालकीच्या गट क्रमांक २९८ मधील शेतजमिनीत घडली.
या प्रकरणी अंकुश बाळकृष्ण आगरकर (वय ५० वर्षे, व्यवसाय शेती, राहणार आगरकरवाडी, चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
या गुन्ह्यात सचिन सुरेश आगरकर, दोन महिला आरोपी आणि सुरेश मारुती आगरकर (राहणार सदर) अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, ते त्यांची पत्नी कल्पना आगरकर आणि आई शंकुबाई यांच्यासह शेतात मशागतीचे काम करीत होते. त्यावेळी आरोपी क्रमांक एक सचिन सुरेश आगरकर याने त्यांच्या शेतात येऊन गट क्रमांक २६४ मधील टणटणीचे झाड का तोडले, अशी विचारणा केली.
याच कारणावरून आरोपीने शिवीगाळ करत फिर्यादीच्या हातातील लोखंडी फावडे हिसकावून घेतले. त्यानंतर फावड्याच्या लाकडी दांड्याने फिर्यादीच्या हातावर आणि पायावर मारहाण करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यावेळी आरोपी क्रमांक तीन असलेल्या महिलेने फिर्यादीच्या पत्नी कल्पना आगरकर यांना हाताने मारहाण केली. तसेच आरोपी क्रमांक चार सुरेश मारुती आगरकर याने शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेनंतर अंकुश आगरकर यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १०५५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ११५(२) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार निघोटे करीत आहेत.