निगडीत मेट्रोच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटली; ठेकेदारावर कारवाईची मागणी

निगडीत मेट्रोच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटली; ठेकेदारावर कारवाईची मागणी

निगडी | १२ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी टिळक चौक बसस्टॉप परिसरात महामेट्रोच्या पिलरचे काम सुरू असताना महापालिकेची मुख्य पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. नागरिक आणि प्रवाशांना या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागला.

मागील दोन ते तीन दिवसांपासून या परिसरात महामेट्रोच्या पिलरचे काम सुरू आहे. कामाच्या ठिकाणालगत महापालिकेची मुख्य पाईपलाईन असून, कामादरम्यान ती फुटल्याचे सांगण्यात आले. महामेट्रोच्या ठेकेदाराने आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे.

मनसेच्या म्हणण्यानुसार, या परिसरात यापूर्वीही चार ते पाच वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, श्रीकृष्ण मंदिरासमोरील रस्ता पाईपलाईनच्या कामासाठी मागील दोन ते तीन वर्षांपासून खोदलेल्या अवस्थेत असल्याचा दावा मनसेने केला आहे. अद्याप हे काम पूर्ण झाले नसल्याने मंदिरात येणाऱ्या भाविकांसह परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

याशिवाय मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, अपघाताचा धोका असल्याचे मनसेने म्हटले आहे.

या समस्यांबाबत मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे सांगितले. मुख्य पाईपलाईनची तातडीने दुरुस्ती करणे, रस्त्यावरील खड्डे बुजवणे आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करणे, या मागण्या त्यांनी मांडल्या.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. मनसेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले आणि मनसेच्या प्रथम महिला नगरसेविका अश्विनी सचिन चिखले-मराठे यांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories