पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून महसूल सहाय्यकपदी नियुक्त झालेल्या चऱ्होली बुद्रुक येथील कु. अंकिता शहाजी तापकीर यांचा श्री वाघेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कठोर परिश्रमाच्या बळावर अंकिता यांनी हे यश मिळवले असून, त्यांच्या नियुक्तीमुळे चऱ्होली बुद्रुक गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
विरंगुळा केंद्रात आयोजित या कार्यक्रमात संघाचे सचिव सिराज मुलाणी यांनी अंकिता तापकीर यांच्या कार्याचे कौतुक केले. श्री वाघेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या पाठीशी उभा राहून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो, असे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अंकिता यांच्या यशापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
अंकिता तापकीर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवून शासनाच्या महसूल सहाय्यकपदासाठी निवड मिळवली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने चिकाटी, सातत्य आणि अभ्यासाच्या जोरावर मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. त्यांच्या यशामागील परिश्रमाचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामदास काळजे होते. कार्याध्यक्ष माणिक बुर्डे यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमात शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या निवृत्त शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. आदर्श निवृत्त शिक्षक दिलीप ढोरजे, प्रा. बबन चव्हाण आणि द्वारकानाथ माळी यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
संस्थेच्या सदस्यांमधील आपुलकी वृद्धिंगत करण्यासाठी सप्टेंबर महिन्यातील वाढदिवसांचाही कार्यक्रमात उत्साहात साजरा करण्यात आला. पुरुषोत्तम जोशी, बाबासाहेब दाभाडे, नंदकुमार रासकर आणि रमेश काळजे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ विरंगुळ्याचे उपक्रम न राबवता समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणे, ही संघाची सकारात्मक भूमिका असल्याचे उपस्थित सदस्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक बुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन सिराज मुलाणी यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजू भोसले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विलास काळजे, देविदास पठारे, विलास तापकीर, उल्हास काटे, नंदकुमार बेल्हेकर, माणिक भोसले, अशोक देवळे, संजय बुर्डे आणि संस्थेच्या अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले.