पिंपरी | २५ सप्टेंबर २०२६ : गणेशभक्तांच्या अलोट गर्दीत आणि ढोल-ताशांच्या गजरात भोसरी परिसरातील गणेश मंडळांनी गणरायाला निरोप दिला. गुरुवारी (दि. २४) पार पडलेल्या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये, ढोल-लेझीम, आकर्षक रथ आणि विविध देखाव्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणूक उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि शांततामय वातावरणात पार पडली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरीतील बापूजी बुवा चौकात गणेश मंडळांच्या स्वागतासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. येथे मंडळांच्या अध्यक्षांचा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि कार्यकारी अभियंता किरण अंदुरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

दुपारी दीडच्या सुमारास वीर हनुमान मित्र मंडळ, भोसरी गावठाण यांची पहिली विसर्जन मिरवणूक स्वागत कक्षाजवळ दाखल झाली. त्यानंतर लोंढे तालीम मित्र मंडळ, श्री कानिफनाथ मित्र मंडळ, नव महाराष्ट्र तरुण मंडळ, हिंदवी स्वराज्य तरुण मित्र मंडळ अँड ट्रस्ट, धर्मवीर संभाजी मित्र मंडळ, नरवीर तानाजी मित्र मंडळ, जय मल्हार मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, नाथसाहेब प्रतिष्ठान, महात्मा फुले मित्र मंडळ यांच्यासह विविध मंडळांच्या मिरवणुका मार्गस्थ झाल्या. विघ्नहर्ता मित्र मंडळ, विठ्ठल नगर, लांडेवाडी यांची मिरवणूक शेवटी स्वागत कक्षातून पुढे मार्गस्थ झाली.

मिरवणुकीत छत्रपती श्री शिवाजी तरुण मंडळाच्या राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या रथाने विशेष लक्ष वेधले. पठारे लांडगे लिंबाची तालीम व्यायाम मंडळाचा विद्युत रोषणाईने सजवलेला रथही आकर्षण ठरला. नव महाराष्ट्र तरुण मंडळाने जगन्नाथ रथासह पारंपरिक केरळी कलाकारांच्या वाद्यवृंदासह काढलेल्या मिरवणुकीने उत्साहात भर घातली.

महापालिकेने विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागरी सुविधा, स्वच्छता आणि निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली होती. भोसरी पोलीस, वाहतूक शाखा, सीआरपीएफचे जवान, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी तसेच मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
