छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने १० ते १४ मेपर्यंत विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने १० ते १४ मेपर्यंत विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ३ दिवसीय 'शिवरूद्र शंभूराजे' या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर महानाट्याचे आयोजन
पिंपरी, ता. ८ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 'विचार प्रबोधन पर्व' या उत्सवाचे आयोजन चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानाच्या मागील पटांगणात १० ते १४ मे २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन रविवारी (ता. १० मे) सायंकाळी ६.३० वाजता महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि त्यांचा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या विचार प्रबोधन पर्वात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शौर्याचा,पराक्रमाचा इतिहास अनुभवावा असे आवाहन महापौर रवि लांडगे यानी केले आहे
या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची उपस्थिती असणार आहे. तर खासदार मेधा कुलकर्णी, पार्थ पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, शंकर मांडेकर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या विचार प्रबोधन पर्वाअंतर्गत १० ते १३ मे या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिपस्पर्श शिवसह्याद्री प्रतिष्ठान निर्मित इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर, अँड. विनय चंद्रकांत दाभाडे लिखित, दिग्दर्शित व प्रतिक चंद्रकांत दाभाडे सह दिग्दर्शित, तीन मजली रंगमंच, २०० हून अधिक कलाकार, चित्तथरारक लढाया तसेच महाराष्ट्रातील लोककलेचा संचय असलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित धगधगते शिवरूद्र शंभुराजे या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. संभाजीनगर, चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानात सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत हे महानाट्य रंगणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग,राज्याभिषेक तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म, बालपण,राज्याभिषेक व संघर्षमय जीवनप्रवास आणि स्वराज्य रक्षणासाठी दिलेले बलिदान यांचे प्रभावी चित्रण या महानाट्यातून अनुभवायला मिळणार आहे.
बर्ड व्हॅली उद्यान, चिंचवड येथे गुरुवारी (ता. १४ मे) सायंकाळी ५ वाजता 'रणगाथा शौर्याची' या विशेष पोवाड्याचे आयोजन करण्यात आले असून याध्ये सुप्रसिद्ध शाहीर सुरेश सूर्यवंशी आसंगीकर व सहकारी आपल्या सादरीकरणातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास जिवंत करणार आहेत. याच दिवशी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याशिवाय सायंकाळी ६ वाजता दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील यांचे 'छत्रपती संभाजी महाराज - एक अद्वितीय योद्धे' या विषयावरील विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचे इतिहासातील योगदान, त्यांचे दूरदर्शी नेतृत्व, युद्धनीती आणि राष्ट्राभिमान यांवर व्याख्यान होणार आहे. महापालिकेतर्फे आयोजित करण्यात कार्यक्रम हे सर्वासाठी खुले तसेच विनामूल्य आहेत.
उद्घाटन समारंभाला स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शिवसेना गटनेते विश्वजित बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी माई पठारे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, नगरसदस्य अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, कुशाग्र कदम, तुषार हिंगे, कुंदन गायकवाड, रिटा सानप, योगीता नागरगोजे, निलेश नेवाळे या मान्यवरांसह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे हे देखील उपस्थित असणार आहेत.