पिंपरी | २३ सप्टेंबर २०२६ : नामांकित कंपनीच्या नावाचा वापर करून बनावट कॉस्मेटिक क्रीम विक्रीसाठी ठेवल्याचा प्रकार पिंपरीतील रिव्हर रोड परिसरात समोर आला आहे. ‘Goree Beauty Cream with LYCOPENE’ या कंपनीच्या नावाचे १२ हजार ६५० रुपये किमतीचे बनावट उत्पादन जप्त करण्यात आले असून याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रईसोद्दीन फजौद्दीन इनामदार (वय ५६, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.
ही कारवाई २३ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते साडेतीनच्या दरम्यान शक्ती कॉस्मेटिक्स, रिव्हर रोड, पीएमपीएमएल बस स्टॉपजवळ, पिंपरी येथे करण्यात आली. याप्रकरणी प्रकाश मनोहरलाल गुरु (वय ३९, रा. पिंपरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीकडे Goree Beauty Cream with LYCOPENE कंपनीच्या नावाने तयार करण्यात आलेला १२ हजार ६५० रुपये किमतीचा बनावट मुद्देमाल आढळून आला. संबंधित क्रीम हे मूळ कंपनीचे असल्याचे भासवून विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
ट्रेडमार्क आणि कॉपीराइट कायद्यानुसार डुप्लिकेट मालाची विक्री व उत्पादन करणे हा गुन्हा असल्याने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) तसेच कॉपीराइट कायद्याच्या कलम ५१ आणि ६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अभिजित केणे पुढील तपास करत आहेत.