वायसीएमच्या औषधांवर प्रश्नचिन्ह; पुरवठादाराचे बिल रोखण्याची मागणी

वायसीएमच्या औषधांवर प्रश्नचिन्ह; पुरवठादाराचे बिल रोखण्याची मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील औषध खरेदीचा मुद्दा उपस्थित झाला. रुग्णालयाला पुरवलेल्या १८ पैकी १७ औषधे निकृष्ट आढळल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला. संबंधित पुरवठादाराला तीन वर्षांऐवजी कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे आणि त्याचे बिल रोखावे, अशी मागणी त्यांनी केली.

वाघेरे यांच्या म्हणण्यानुसार, जेजुरी एमआयडीसीतील ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल्स अँड रिसर्च फाउंडेशन’ या कंपनीकडून महापालिकेने दर करारानुसार औषधे घेतली. कंपनीकडून नेमकी किती औषधे खरेदी झाली, एकूण बिल किती आहे, किती रक्कम अदा केली आणि किती बाकी आहे, याचा तपशील प्रशासनाने जाहीर करावा, असे ते म्हणाले. कंपनीकडून २३९ प्रकारची औषधे कधीपासून घेतली जात होती आणि यापूर्वी पुरवलेल्या औषधांचा दर्जा तपासण्यात आला का, असे प्रश्नही त्यांनी विचारले.

खरेदीपूर्वी परवान्यांची पडताळणी झाली का?

अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईत कंपनीकडे काही औषधांच्या उत्पादनासाठी वैध परवानगी नसल्याचे समोर आल्याचे वाघेरे यांनी सांगितले. औषध खरेदीपूर्वी महापालिकेने संबंधित कागदपत्रे तपासली होती का, याचा खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली. खरेदी प्रक्रियेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.

दर्जाबाबत आक्षेप असलेल्या औषधांचे बिल अदा करण्याची प्रक्रिया सुरू असेल, तर ती तातडीने थांबवावी. प्रशासनाने रक्कम अदा केल्यास कायदेशीर मार्गाने दाद मागू, असा इशारा वाघेरे यांनी दिला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories