बालंतविडा योजनेच्या २५ कोटींच्या निविदेवर आक्षेप

बालंतविडा योजनेच्या २५ कोटींच्या निविदेवर आक्षेप

पिंपरी | २५ नोव्हेंबर २०२६ : स्तनदा माता आणि नवजात बालिकांना साहित्य पुरवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या बालंतविडा योजनेच्या सुमारे २५ कोटी रुपयांच्या निविदेवर नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आक्षेप घेतले आहेत. निविदेतील आर्थिक आणि तांत्रिक अटींमुळे स्थानिक महिला बचत गट तसेच सूक्ष्म व लघुउद्योजकांना सहभागी होणे कठीण ठरू शकते, असे त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. स्वतंत्र चौकशी पूर्ण होईपर्यंत निविदा प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

खर्च, कालावधी आणि संचसंख्येबाबत खुलासा मागितला

निविदा जाहिरातीतील १० कोटी ९४ लाख ३४ हजार रुपये आणि १३ कोटी ८५ लाख ६० हजार रुपये या दोन रकमांमधील फरक स्पष्ट केलेला नाही, असे वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे. एकूण अंदाज कसा तयार केला, वस्तुनिहाय बाजारभाव तपासले का आणि संबंधित लेखाशीर्षाखाली पुरेशी तरतूद आहे का, याची चौकशी त्यांनी मागितली. जाहिरातीत दोन वर्षे, तर एका अटीत तीन वर्षे नमूद आहेत. ३६ हजार माता संच आणि १७ हजार बालिका संच हे वार्षिक आहेत की संपूर्ण कालावधीसाठी, हेही स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली.

बचत गटांच्या सहभागावर अटींचा परिणाम?

बयाणा रक्कम सुमारे २४ लाख ८० हजार रुपये, तर अनामत रक्कम सुमारे १ कोटी २४ लाख रुपये असल्याचे निवेदनात नमूद आहे. अनामतीसाठी ३ टक्के आणि ५ टक्के यापैकी नेमकी कोणती अट लागू आहे, निविदा शुल्काची तरतूद काय आहे आणि पात्र सूक्ष्म व लघुउद्योगांना शासकीय सवलती दिल्या आहेत का, हे स्पष्ट करावे, असे वाघेरे यांनी म्हटले आहे.

अनुभव, गुणवत्ता तपासणी आणि वितरणावर प्रश्न

दीड कोटी रुपयांच्या पुरवठा अनुभवाची अट कोणत्या कालावधीसाठी आहे, तत्सम शासकीय पुरवठा ग्राह्य धरला जाईल का आणि तीन ISO प्रमाणपत्रे का आवश्यक आहेत, अशी विचारणा त्यांनी केली. नमुने कोणत्या प्रयोगशाळेत तपासणार, तिला NABL मान्यता आहे का, तपासणीचे निकष काय आणि ३० हजार रुपये शुल्काचा आधार काय, हेही स्पष्ट करावे, अशी मागणी आहे.

साहित्य वाय.सी.एम. भांडारात जमा करायचे की लाभार्थ्यांना थेट द्यायचे, हे निश्चित करावे. खाद्यपदार्थांची गुणवत्ता, साठवणूक, पॅकिंग, अंतिम वापराची तारीख, वाहतूक आणि वितरणाची जबाबदारी कोणाची, हे स्पष्ट करावे. लाभार्थ्यांची पात्रता, उत्पन्न मर्यादा, आवश्यक कागदपत्रे आणि नवजात बालकांच्या समावेशाबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.

स्वतंत्र चौकशी आणि लेखी अहवालाची मागणी

निविदा तयार करणाऱ्या विभागापासून स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमावी, अशी मागणी वाघेरे यांनी केली. मूळ अंदाजपत्रक, वस्तुनिहाय दर, मागील तीन वर्षांतील प्रसूती व लाभार्थी संख्या, प्रयोगशाळेचे दरपत्रक, गुणवत्ता तपासणी व निविदा समितीचे अहवाल आणि मंजुरींच्या प्रती उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी म्हटले आहे. आवश्यक सुधारणा शुद्धिपत्रकाद्वारे जाहीर कराव्यात. मूलभूत त्रुटी आढळल्यास निविदा नियमानुसार रद्द करून नव्या निविदेसाठी किमान २१ दिवस द्यावेत. योजनेला किंवा कोणत्याही विशिष्ट पुरवठादाराला विरोध नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी कार्यवाहीचा लेखी अहवाल मागितला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories