महापालिकेची ६० कोटींची देयके कशी मंजूर झाली? सुलभा उबाळेंचा सवाल

महापालिकेची ६० कोटींची देयके कशी मंजूर झाली? सुलभा उबाळेंचा सवाल

पिंपरी | २५ नोव्हेंबर २०२६ : महापालिकेच्या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर काही कामांची कोट्यवधी रुपयांची देयके नेमकी कशी मंजूर झाली, असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या आणि नगरसेविका सुलभा उबाळे यांनी उपस्थित केला आहे. या देयकांची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

उबाळे यांच्या निवेदनानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका सभेने २०२५-२६ च्या सुधारित आणि २०२६-२७ च्या मूळ अंदाजपत्रकाला २४ मार्च २०२६ रोजी अंतिम मंजुरी दिली. त्यानंतर काही नगरसेवकांनी नगरसचिव विभागामार्फत उपसूचना सादर करण्याची प्रक्रिया न पाळता १७ उपसूचना थेट लेखा विभागाकडे दिल्याचा आरोप उबाळे यांनी केला.

त्यापैकी १४ उपसूचनांशी संबंधित ६० कोटी १८ लाख ६८ हजार ५३ रुपयांची देयके अदा झाल्याचे उबाळे यांनी कागदपत्रांचा हवाला देत म्हटले आहे. देयके अदा करण्याची कार्यवाही ३१ मार्च २०२६ रोजी झाल्याचे निवेदनात नमूद आहे. या उपसूचनांची छाननी कोणी केली, त्यांना कोणत्या अधिकाराने मंजुरी दिली आणि देयके अदा करताना कोणते नियम लागू केले, याचा खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

संबंधित कामांची गरज काय होती, त्यांचा लाभ कोणाला झाला आणि ती कामे मंजुरीपूर्वीच झाली होती का, हेही तपासावे, असे उबाळे यांनी म्हटले आहे. कंत्राटदारांनी कोणत्या प्रशासकीय मान्यतेच्या आधारे बिले सादर केली, याची चौकशी करावी. सर्व १७ उपसूचनांच्या प्रती, मंजुरी आदेश, कामांची माहिती आणि देयकांची यादी सार्वजनिक करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

चौकशीत नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करावी, असे उबाळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories