PCMC च्या विकासकामांना गती मिळणार? स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर

PCMC च्या विकासकामांना गती मिळणार? स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर

पिंपरी | २६ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेशी संबंधित कामांना महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. यासोबतच चिंचवड आणि पुनावळ्यातील ऑक्सिजन पार्कच्या देखभालीचे काम तृतीयपंथीयांना देण्याच्या प्रस्तावालाही मान्यता मिळाली आहे. बुधवारी (25 नोव्हेंबर) स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात ही बैठक झाली.

बैठकीत गवळीनगर, दिघी, चऱ्होली, भोसरी, थेरगाव, चिंचेचा मळा, कासारवाडी, रावेत, किवळे आणि मामुर्डी आदी भागांतील रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण आणि इतर स्थापत्य दुरुस्तीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. सांडपाणी वाहिन्या आणि चेंबरची दुरुस्ती तसेच पावसाळी गटारांच्या साफसफाईचा यात समावेश आहे. ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कावेरी नगर टाकी आणि बायपास जलक्षेत्रातील पाणी वितरण व्यवस्था चालवणे, तिची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासही मान्यता मिळाली.

सार्वजनिक स्वच्छतागृहांची रोजची साफसफाई, रस्ते आणि गटारांची स्वच्छता, नालेसफाई आणि बांधकामाचा राडारोडा उचलण्याच्या प्रस्तावांना समितीने मंजुरी दिली. अतिक्रमण कारवाईसाठी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली. सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांना मुदतवाढ देण्यात आली. आरोग्य कर्मचारी व त्यांची कुटुंबे, लहान मुले, युवक आणि सार्वजनिक शौचालये यांच्याशी संबंधित सर्वेक्षणासाठी नियुक्त ३८ सर्वेक्षणकर्त्यांना कार्योत्तर मान्यता देण्यात आली. त्यांचे मानधन थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

चिंचवडमधील ६ हजार चौरस मीटर आणि पुनावळ्यातील ७ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ऑक्सिजन पार्कची देखभाल, देखरेख कर्मचाऱ्यासह, तृतीयपंथीयांना १८ महिन्यांसाठी देण्यास समितीने मंजुरी दिली. तृतीयपंथीयांना उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे हा या निर्णयामागचा उद्देश आहे.

अग्निशमन केंद्रांसाठी व्हीएचएफ आणि पीओसी वॉकीटॉकी पुरवणे व वायरलेस यंत्रणा सुधारणे, मोरवाडी आयटीआय इमारतीत लिफ्ट बसवणे आणि विद्युत दाहिनी चालवणे व तिची देखभाल करणे या कामांनाही मान्यता मिळाली. वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढीतील ब्लास्ट फ्रीझरच्या आठ वर्षांच्या देखभाल व दुरुस्ती करारालाही समितीने मंजुरी दिली.

मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा, महापौर चषक, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा, सार्वजनिक गणेशोत्सव आणि मोशी खाण परिसरातील कार्यक्रमांसाठी तात्पुरती प्रकाश व ध्वनी व्यवस्था, जनरेटर आणि सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावही मंजूर झाले. महापालिकेच्या कार्यक्रमांसाठी फ्लेक्स आणि बॅनर छपाई व पुरवठ्याच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories