चिखलीत तरुणाला अंधाऱ्या खोलीत नेऊन मारहाण; ३ हजार रुपये हिसकावले

चिखलीत तरुणाला अंधाऱ्या खोलीत नेऊन मारहाण; ३ हजार रुपये हिसकावले

पिंपरी-चिंचवड | ४ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात एका १९ वर्षीय तरुणाला अंधाऱ्या खोलीत नेऊन बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी तसेच मोबाईल चार्जरच्या वायरने मारहाण करून त्याच्याकडील तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे. एवढेच नाही, तर पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी प्रतिक महारुद्र कराळे (वय १९ वर्षे, राहणार नेवाळे वस्ती, चिखली, पुणे; मूळ राहणार मु. केळवाडी, पो. वाशी, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली. फिर्यादी हे स्वरा ब्लॉसम बिल्डिंगसमोरील फ्लिपकार्ट कंपनीच्या गोदामाजवळ असताना आरोपी क्रमांक एक आणि दोन यांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

त्यानंतर आरोपींनी जबरदस्तीने फिर्यादीच्या गाडीची चावी काढून घेतली. आरोपींकडील होंडा ॲक्टिव्हा दुचाकीवर दोघांच्या मध्ये बसवून फिर्यादीला अंगणवाडी चौक, मोरेवस्ती, चिखली येथील एका पत्र्याच्या छोट्या अंधाऱ्या खोलीत नेण्यात आले.

तेथे आरोपींचे आणखी दोन साथीदार आले. त्यानंतर चौघांनी मिळून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मोबाईल चार्जरच्या वायरने पाठीवर मारहाण करून बिअरच्या बाटलीने डाव्या हाताच्या पोटरीवर मारल्याने फिर्यादी जखमी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मारहाणीदरम्यान आरोपींनी फिर्यादीच्या पँटच्या मागील खिशातील तीन हजार रुपये हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. यामध्ये ५०० रुपयांच्या तीन नोटा, २०० रुपयांची एक नोट आणि १०० रुपयांच्या १३ नोटांचा समावेश होता.

तसेच आरोपींनी त्यांच्या कंबरेला लावलेले कोयते बाहेर काढून त्यांचा धाक दाखवला. पोलिसांत तक्रार दिल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. आरोपींनी दहशत निर्माण करून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी वेदांत शांताराम लोखंडे (वय १८ वर्षे, राहणार मोरेवस्ती, चिखली), सक्षम (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही), आर्यन ऊर्फ बॉण्ड (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) आणि शुभम तानाजी जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०२/२०२६ नोंदवण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांसह इतर कायद्यांनुसार कारवाई करण्यात आली आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories