पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला कचरामुक्त करण्याच्या दिशेने महापालिकेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेत ‘स्वच्छ, सुंदर, शून्य कचरा शाळा’ प्रकल्पाचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. शाळेत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन शाळेच्या परिसरातच करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, शून्य कचरा संकल्पना म्हणजे ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो, त्याच ठिकाणी त्याचे योग्य व्यवस्थापन करणे. शाळेत निर्माण होणारा कचरा शाळेतच व्यवस्थापित झाला पाहिजे. या उपक्रमांतर्गत ‘शून्य कचरा मॉनिटर’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. शाळेतील स्वच्छता राखणे आणि कचरा टाकणाऱ्यांना समजावून सांगणे, अशी जबाबदारी या मॉनिटरवर असेल.
विद्यार्थ्यांनी केवळ शाळेपुरते स्वच्छतेचे महत्त्व मर्यादित न ठेवता आपल्या पालकांनाही कचरा वर्गीकरण आणि योग्य विल्हेवाट याबाबत जागरूक करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. थेरगाव येथील शाळेत हा प्रकल्प पायलट स्वरूपात राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि उपक्रमाचे परिणाम पाहून इतर शाळांमध्येही त्याची अंमलबजावणी करण्याचे नियोजन महापालिका करणार आहे.
नगरसदस्या योगिता बारणे यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना शून्य कचरा रिसायकल बॅग आणि शून्य कचरा किटचे वाटप करण्यात आले. तसेच आयुक्तांच्या हस्ते ‘स्वच्छता के सुपरहीरोज’ या पुस्तकाचेही वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचून स्वच्छतेचा संदेश आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी थेरगाव येथील पीएम श्री माध्यमिक शाळेला भेट देऊन अस्ट्रोनॉमी लॅब, टिंकरिंग लॅब, रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र आणि सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वारली चित्रांचेही त्यांनी कौतुक केले.