पिंपरी-चिंचवड | २३ सप्टेंबर २०२६ : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात पिंपरी-चिंचवड जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत २० वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रामू कुंजल निषाद (वय ४०, रा. शंभू कॉलनी, विनायक नगर, मोशी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची सुनावणी पूर्ण करून विशेष व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. यादव यांनी २२ सप्टेंबर रोजी निकाल दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ३ एप्रिल २०२६ रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ६४(१), ६५(२), ७४, ३५१ तसेच POCSO कायद्याच्या कलम ४, ६ आणि ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक चैत्राली भिसे यांनी तपास पूर्ण करून ३० दिवसांच्या आत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. अभियोग पक्षाने खटला जलदगतीने चालविण्याची विनंती केल्यानंतर न्यायालयाने ती मान्य केली आणि २२ सप्टेंबर रोजी निकाल दिला.
न्यायालयाने बीएनएस कलम ६४(१) आणि ६५(२) अंतर्गत प्रत्येकी २० वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंड, कलम ७४ आणि ३५१ अंतर्गत प्रत्येकी ३ वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंड सुनावला. POCSO कायद्याच्या कलम ४ आणि ६ अंतर्गत प्रत्येकी २० वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंड, तर कलम ८ अंतर्गत ५ वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंड सुनावण्यात आला. या सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता स्मिता मुकुंद चौगुले यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली, तर कोर्ट पैरवी अधिकारी एस. आर. सरसे यांनी न्यायालयीन कामकाजात समन्वय साधला.