बांधकाम साईटवर मजुरांमध्ये वाद, एकाचा तिसऱ्या मजल्यावरुन फेकल्याने मृत्यू
Mar 30 2026
38
बांधकाम साईटवर मजुरांमध्ये वाद, एकाचा तिसऱ्या मजल्यावरुन फेकल्याने मृत्यू
पिंपरी, ता. ३० - सहकाऱ्याच्या किरकोळ बोलण्याचा राग आल्याने एका २७ वर्षीय मजुराने सहकारी मजुराला शिवीगाळ व मारहाण करत बांधकाम साईटवरच तिसऱ्या मजल्यावरुन खाली फेकून दिले. जमिनीवर आपटलेल्या या मजूराचा जागीच मरण पावला आहे. ही घटना वाल्हेकरवाडी-चिंचवड येथे रविवारी (ता. २९) घडली आहे.
याबाबत, राजु श्रीराम महतो (वय ३८ वर्षे, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली. आरोपी पुनित कुमार रामनक्षत्र शुक्ला (वय २७ वर्षे, रा. अष्टविनायक चौक, मोरे वस्ती-चिखली) याच्याविरोधाच चिंचवड पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ३०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मूळचा बिहार राज्यातील आहे.
रविवारी (ता. २९) सकाळी फिर्यादी राजू महतो यांचा भाचा केशव मोहन महतो, नितिन सरोज, सनोज महतो व आरोपी पुनितकुमार घराच्या स्लॅबच्या कामासाठी वाल्हेकरवाडी येथे गेले होते. त्यावेळी केशव हा आरोपी पुनीत कुमार याला खाली काम करण्याकरीता बोलावण्यास गेला असता, पुनितकुमार फोनवर बोलत होता. केशव त्याला म्हणाला की, "तु येथे काम करायला आला की, फोन वर बोलायला आला." केशवच्या या बोलण्याचा आरोपी पुनितकुमारला राग आला व त्याने केशव महतो याची शर्टची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली. "मला सांगणारा तू कोण" असे विचारत केशवला मारहाण केली व थेट त्याला तिसऱ्या मजल्यावरुन खाली फेकून ठार मारले.
आरोपी विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यातभारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १०३,३५२, ११५(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.