नाट्य परिषदेच्या 'कलाकार कट्टा' उपक्रमाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद
पिंपरी, ता. २९ - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित 'कलाकार कट्टा' उपक्रमाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. चिंचवडगावातील राजमाता जिजाऊ उद्यानात पार पडलेल्या कलाकार कट्टयावर शाहीर वनिता मोहिते यांच्या संजीवनी महिला शाहिरी पथक यांनी पोवाडा सादर केला. यावेळी जुबेन आलीफ शेख यांनी लिहिलेल्या 'द नॉवेल्टीज' या दोन अंकी नाट्य पुस्तकाचे प्रकाशन नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांचे हस्ते करण्यात आले.
पारंपरिक वाद्यात ऋषिकेश गायकवाड, जय कसबे, योगेश उकिरडे आणि निखिल झोंबाडे या कलाकारांनी ढोल-ताशा वादनाचे सादरीकरण केले. बालकलाकारांनी नाट्यछटा सादर केली. राजू जाधव आणि सविता इंगळे यांनी कविता, जगदीश खोडके व प्रदीप मांडरे यांनी केराओके, माई गटणे आणि सहकारी यांनी एकनाथी भारुड सादर केले.
सुहास जोशी, राजू बंग, सीमा गांधी, प्रकाश ढवळे, गौरी लोंढे, पंकज चव्हाण यांनी संयोजन केले. आसाराम कसबे यांनी प्रास्ताविक केले. राज आहेरराव यांनी सूत्रसंचालन केले. किरण येवलेकर यांनी आभार मानले.