शेअर मार्केटच्या नावाखाली चिंचवडच्या तरुणाची फसवणूक!

शेअर मार्केटच्या नावाखाली चिंचवडच्या तरुणाची फसवणूक!

चिंचवड | २३ सप्टेंबर २०२६ : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत चिंचवडमधील २४ वर्षीय तरुणाची १६ लाख ४२ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २ ऑगस्ट २०२३ ते २७ मे २०२४ या कालावधीत घडला. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन रामकृष्ण पाटील (वय २४, रा. बिजलीनगर, चिंचवड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी विशाल चंदू पाटील (रा. शिरपूर, जि. धुळे), गौरव चंदू पाटील (रा. शिरपूर, जि. धुळे) आणि एक महिला (रा. धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी संगनमत करून त्यांना ‘गुरु ट्रेड ७’ नावाच्या ॲपमध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगितले. सुरुवातीला नफा झाल्याचे दाखवून फिर्यादीला आणखी पैसे गुंतवण्यास सांगण्यात आले.

त्यानंतर गुंतवलेले पैसे दुप्पट झाल्याचे सांगून ते काढण्यासाठी आणखी पैसे भरावे लागतील, असे आरोपींनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने वेळोवेळी ऑनलाइन स्वरूपात आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये एकूण १६ लाख ४२ हजार ५०० रुपये जमा केले.

मात्र, संबंधित रक्कम प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये न गुंतवता आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories