पुणे | २४ सप्टेंबर २०२६ : भारताला प्रथमच सायकलिंगमधील प्रतिष्ठेच्या यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपचे यजमानपद मिळाले असून, २०३२ मध्ये ही जागतिक स्पर्धा पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी भारत सरकारच्या सहकार्याने संयुक्तपणे सादर केलेल्या उमेदवारीला यश मिळाले आहे. पुण्याला जागतिक सायकलिंग केंद्र म्हणून विकसित करण्यासोबत क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडू विकास आणि क्रीडा पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पुण्याच्या उमेदवारीचे अंतिम सादरीकरण झाल्यानंतर कॅनडातील मॉन्ट्रियल येथे झालेल्या यूसीआय काँग्रेसमध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली. यजमानपदासाठी अंतिम टप्प्यात भारतातील पुणे आणि नेदरलँड्समधील ग्रोनिंगेन/ड्रेंथे यांच्यात स्पर्धा होती. कोलंबिया आणि मेक्सिको बाहेर पडल्यानंतर ही दोन्ही ठिकाणे अंतिम फेरीत पोहोचली होती. पुण्याची उमेदवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव मनिंदर पाल सिंग यांनी सादर केली.
यापूर्वी तीन सदस्यीय यूसीआय तपासणी पथकाने पुण्याला भेट देऊन बालेवाडी स्टेडियम, पुणे विद्यापीठ परिसर, प्रस्तावित स्पर्धा मार्ग आणि पायाभूत सुविधांची पाहणी केली होती. पुण्याच्या यशस्वी उमेदवारीमध्ये बजाज पुणे ग्रँड टूरच्या आयोजनाचा अनुभव महत्त्वाचा ठरल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. २०२६ च्या पुणे ग्रँड टूरसाठी २५ हून अधिक सरकारी विभागांमध्ये समन्वय साधण्यात आला आणि ४३७ किलोमीटरचे रस्ते रेससाठी सज्ज करण्यात आले होते.
UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जगातील आघाडीचे सायकलपटू प्रतिष्ठेच्या ‘रेनबो जर्सी’साठी स्पर्धा करतात. २०२५ मध्ये किगाली येथे झालेल्या स्पर्धेत ११३ देशांतील ७३४ सायकलपटूंनी सहभाग घेतला होता. सुमारे २० लाख प्रेक्षकांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली होती, तर जगभरातील दूरचित्रवाणी प्रेक्षकसंख्या सुमारे ३० कोटी होती.
२०३२ च्या स्पर्धेच्या माध्यमातून पुण्याला भारतातील प्रमुख सायकलिंग जिल्हा म्हणून विकसित करण्याचा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. महिला आणि युवा सायकलिंग, खेळाडू प्रशिक्षण, पायाभूत सुविधा, स्थानिक रोजगार, शाश्वतता आणि क्रीडा पर्यटनावरही भर दिला जाणार आहे.