अनंत चतुर्दशीसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

अनंत चतुर्दशीसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पिंपरी-चिंचवड | २५ सप्टेंबर २०२६ : अनंत चतुर्दशीनिमित्त होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. यंदा १३९८ सार्वजनिक गणपती मंडळांचे विसर्जन मिरवणुकीद्वारे होणार असून ६८९६ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जन सोहळा शांततेत आणि मंगलमय वातावरणात पार पडावा यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवापूर्वी आयुक्तालय स्तरापासून पोलीस ठाण्यांपर्यंत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. एकूण १७५ बैठका घेऊन मंडळांना आगमन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे, ध्वनिप्रदूषण टाळणे आणि लेझर लाईटचा वापर न करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत पोलिसांनी २२ सप्टेंबरपर्यंत ५२७ गुन्हेगारांवर कारवाई केली असून आणखी गुन्हेगारांवर कारवाई सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच ३० सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘एक मंडळ-एक अंमलदार’ योजनेची १०० टक्के अंमलबजावणी करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ६ हजारांपेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि अंमलदार सज्ज करण्यात आले आहेत. राज्य राखीव पोलीस दल, गृहरक्षक दल तसेच बाहेरील घटकांकडूनही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. शहरातील नागरिकांनी सार्वजनिक गणेश मंडळांची माहिती Bappa.org वर नोंदविण्याचे आवाहन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले आहे.

दरम्यान, काही गणेश मंडळांनी डीजेचा वापर टाळला असला तरी निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालक आणि मालकांवर कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ-२ मध्ये सर्वाधिक २९, परिमंडळ-१ मध्ये १६, परिमंडळ-३ मध्ये ५ आणि परिमंडळ-४ मध्ये १ अशा एकूण ५१ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

विसर्जनासाठी १ अपर पोलीस आयुक्त, ८ पोलीस उपायुक्त, १६ सहायक पोलीस आयुक्त, ७४ पोलीस निरीक्षक, २९० सहायक/पोलीस उपनिरीक्षक, ३ हजार ८० पोलीस अंमलदार, ६ आरसीपी पथके, ६०० होमगार्ड, पीएमएफ १ प्लाटून आणि १६६ वॉर्डन यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories