पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सीएनजीच्या दरात वाढ, नवीन दर प्रति किलो ९२.२५ रुपये
May 09 2026
41
पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सीएनजीच्या दरात वाढ, नवीन दर प्रति किलो ९२.२५ रुपये
पुणे, ता. ९ - नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाल्याने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने 'सीएनजी'च्या किरकोळ दरात प्रति किलो १.५० रुपयांची वाढ केली आहे. नवीन दर आज (९ मे) मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. दरवाढीनंतर सीएनजीचा किरकोळ विक्री दर प्रति किलो ९२.२५ रुपये (करांसहित) इतका असणार आहे.
ही दरवाढ पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरात लागू होणार आहे. सीएनजी दरात वाढ झाली असली तरी, सीएनजी हा पर्याय अजूनही परवडणारा आहे. पुणे शहरातील सध्याच्या दरांनुसार, प्रवासी कारसाठी पेट्रोलच्या तुलनेत सुमारे ४५ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत सुमारे २२ टक्के बचत होत आहे. ऑटोरिक्षा चालकांसाठी ही बचत सुमारे २४ टक्के असल्याचे, 'एमएनजीएल'ने म्हटले आहे.
घरगुती पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायू (पीएनजी) च्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ग्राहकांन नवीन दराची नोंद घ्यावी, असे आवाहन 'एमएनजीएल' कडून करण्यात आले आहे.