घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण फक्त ओटीपी प्रणालीद्वारेच होणार - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Mar 17 2026
50
घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण फक्त ओटीपी प्रणालीद्वारेच होणार - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पिंपरी, ता. १७ - सध्या शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा पसरल्या असून गॅस मिळत नसल्याच्या तक्रारीही येत आहेत. या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण फक्त ओटीपी (OTP) प्रणालीद्वारेच करण्यात येणार असून गॅस बुकिंग केल्यानंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक राहील,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. १६) झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील सर्व तेल कंपन्या व गॅस एजन्सींच्या प्रतिनिधींना घरगुती गॅस सिलेंडर वितरणाबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
या बैठकीत घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा फक्त ओटीपी प्रणालीद्वारेच करण्याचे निर्देश देण्यात आले. गोदाम, गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट गॅस सिलेंडरचे वितरण पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना तेल कंपन्या व वितरकांना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार सर्व गॅस एजन्सींनी त्यांच्या गोदाम किंवा कार्यालयाबाहेर गॅस सिलेंडरचे वितरण फक्त ओटीपीच्या माध्यमातून 96 तासांच्या आत घरपोच करण्यात येईल, असा आशय दर्शविणारे फलक लावावेत, असे निर्देश देण्यात आले. याशिवाय, गॅस एजन्सींनी ग्राहकांनी एसएमएस द्वारेही ओटीपीद्वारे गॅस सिलिंडर घरपोच मिळेल, गॅस एजन्सीसमोर गर्दी करु नये असा संदेश पाठवावा असे एजन्सींना सांगण्यात आले आहे.