दुबईमध्ये अडकलेल्या एकूण १८४ नागरिकांपैकी १११ नागरिक पुण्यात सुखरुप पोहोचले
Mar 05 2026
40
दुबईमध्ये अडकलेल्या एकूण १८४ नागरिकांपैकी १११ नागरिक पुण्यात सुखरुप पोहोचले
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती, परदेशातील भारतीयांना सतर्क राहण्याच्या सूचना
पिंपरी, ता. ५ - ईस्त्राएल व इराण या देशांतील युद्धामुळे दुबई येथे अडकलेल्या एकूण १८४ नागरिकांपैकी १११ नागरिक पुण्यात सुखरुप पोहोचले आहेत. १९ नागरिकांच्या विमान उड्डाणाची वेळ बदलण्यात आली असून ५४ नागरिकांना परत आणण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवेत, बहारीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबूधाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दूतावासांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासांशी संपर्क साधावा. केंद्र सरकार व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून, महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्कता बाळगली जात आहे, असे महाराष्ट्र शासनाने सांगितले आहे.