रेशन कार्डधारकांना दरमहा रॉकेल उपलब्ध करुन द्यावे, ऑल महाराष्ट्र रेशन धान्य दुकानदार संघटनेची मागणी
Mar 17 2026
54
रेशन कार्डधारकांना दरमहा रॉकेल उपलब्ध करुन द्यावे, ऑल महाराष्ट्र रेशन धान्य दुकानदार संघटनेची मागणी
पिंपरी, ता. १७ - शहरात एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला असल्याने गरीब व हातावर पोट असलेल्या कुटुंबांसमोर स्वयंपाकाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांना दरमहा दोन ते तीन लिटर रॉकेल उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी ऑल महाराष्ट्र रेशन धान्य दुकानदार संघटनेचे खजिनदार विजय गुप्ता यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
याविषयी, गुप्ता यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गॅस आयात विस्कळीत झाल्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अनेक भागांत एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी झाला आहे. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नसल्याने स्वयंपाकासाठी अडचणी निर्माण होत आहेत. एकेकाळी स्वयंपाकासाठी प्रमुख पर्याय असलेले रॉकेल रेशन दुकानांतून बंद झाले असून, खुल्या बाजारातही उपलब्ध नाही.
इंधन टंचाईच्या काळात गरीब कुटुंबाची चूल विझू नये यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात. रेशन दुकानांमार्फत रॉकेलचा कोटा पुन्हा सुरु केल्यास त्यांना दिलासा मिळेल, असे गुप्ता यांनी म्हटले आहे.