पिंपरी-चिंचवडमध्ये आजपासून १५ टक्के पाणी कपात लागू
पिंपरी, ता. १९ - सद्यस्थितीत पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, यंदा मान्सूनच्या झालेल्या विलंबामुळे पाण्याची उपलब्धता मर्यादित झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर, पाटबंधारे विभाग, पुणे यांनी उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेस १५ टक्के पाणी कपात करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये शुक्रवार, दिनांक १९ जून २०२६ पासून १५ टक्के कपात करण्यात येत आहे.
सर्व नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक कारणांसाठी करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, तसेच पाणी जपून व काटकसरीने वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने केले आहे. शहरात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने स्विमिंग पूल बंद करावेत, तसेच वॉशिंग सेंटर्स आणि बांधकामांच्या ठिकाणी होणाऱ्या पाणी वापराची तपासणी करून कारवाई करावी, असे निर्देश महापौर रवी लांडगे यांनी नुकतेच दिले आहेत.
पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, मान्सूनच्या आगमनास झालेल्या विलंबामुळे आगामी कालावधीतील पाण्याची उपलब्धता आणि वाढती मागणी लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील पाणीपुरवठ्यात आवश्यक ती कपात करण्यात आली असल्याचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले आहे.
पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा.
उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा. वाहन धुणे, बागांना अतिरिक्त पाणी देणे, नळ विनाकारण सुरू ठेवणे यांसारख्या बाबी टाळून पाणी बचतीत सक्रिय सहभाग नोंदवावा. पाण्याची बचत ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, पाणी बचतीचे नियम पाळून महापालिकेला सहकार्य करावे.
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका