पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या नातवाईकाकडूनच पती ठार
पिंपरी, ता. २५ - पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या नातेवाईकाने पतीला लाकडी दांडक्याने मारहाण करुन अक्षरशः ठार केले आहे. ही घटना मावळ तालुक्यातील परंदवडी येथे गुरुवारी (ता. २३) रात्री १० च्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात शुक्रवारी (ता. २४) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, सुनिता लक्ष्मण उर्फ दगड मुकणे (वय २७ वर्षे, विटभट्टी कामगार, रा. परंदवडी, ता. मावळ) यांनी पोलिसांत तक्रार दिली. फिर्यादी सुनिता यांचा मामा संतोष वाघमारे (वय ४० वर्षे) हा या घटनेतील आरोपी आहे, तोही परंदवडी येथेच राहतो. फिर्यादी सुनिता व तिचा पती मयत लक्ष्मण उर्फ दगड मुकणे यांच्यात घरगुती कारणावरुन भांडण सुरु होते. आरोपी संतोष वाघमारे हा भांडण सोडवण्याकरीता तिथे आला. लक्ष्मण हा कोणाचे काही ऐकत नव्हता म्हणून आरोपीने त्याच्या कानावर लाकडी दांडक्याने मारुन त्यास ठार मारले, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपी अटक नाही. आरोपीवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.