तरुणांनी औषधांचे न करता कसून व्यायाम करुन शरीरसौष्ठव कमवावे - महापौर रवी लांडगे
‘महापौर चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे’ प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उद्घाटन
पिंपरी, ता. ३० - '' आपले तंदुरुस्त शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे. त्यामुळे तरुणांनी औषधांचे न करता कसून व्यायाम करुन शरीरसौष्ठव कमवावे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.'', असा मोलाचा सल्ला महापौर रवी लांडगे यांनी तरुणांना दिला. .
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने ‘महापौर चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे’ उद्घाटन महापौरांच्या हस्ते चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी (ता. २९) झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, नगरसदस्य धर्मपाल तंतरपाळे, शितल शिंदे, मंदार देशपांडे, अर्चना सस्ते यांच्यासह इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे डॉ. संजय मोरे, राजेश सावंत, अॅड. सचिन रणदिवे, महापालिकेचे उपायुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह स्पर्धक आणि नागरिक उपस्थित होते.
महापौर लांडगे म्हणाले, ''तरुणांनी आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य देत नैसर्गिक पद्धतीने शरीरसौष्ठव घडवण्यावर भर द्यावा. आरोग्य हीच खरी संपत्ती असून इतर सर्व संपत्तीपेक्षा ती अधिक महत्त्वाची आहे. पैसा, प्रतिष्ठा आणि इतर गोष्टी आयुष्यात पुन्हा मिळू शकतात. मात्र एकदा आरोग्य बिघडले तर ते पूर्ववत करणे कठीण असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शरीरावर प्रेम करत नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि संयम यांचा अवलंब करुन नैसर्गिक बॉडी बिल्डिंगकडे लक्ष द्यावे. तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली रुजवण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत.'' भाऊसाहेब भोईर व कैलास कुटे यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. संजय मोरे म्हणाले, ''या स्पर्धेत २३ लाखांची रोख बक्षिसे दिली जात आहेत. स्पर्धा घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेले सहकार्य निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. आगामी काळात आशियाई स्पर्धांचे पिंपरी चिंचवड शहरात आयोजन करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा. अशा स्पर्धेमुळे शहरातील तरुण व्यायामावर प्रेम करतील.'' कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त पंकज पाटील यांनी केले. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. शितल शिंदे यांनी आभार मानले.
आज समारोप....
'महापौर चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा - २०२६' मध्ये महाराष्ट्र सह जम्मू-काश्मीर, केरळ, उत्तर प्रदेश , आसाम पश्चिम बंगाल अशा विविध राज्यातून ४४५ पुरुष व ५० महिला स्पर्धेक सहभागी झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड अमेच्यूर बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे. सोमवारी (ता.३०) स्पर्धेचा समारोप होणार आहे.