पिंपरी-चिंचवड | ८ नोव्हेंबर २०२६ : महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष तथा पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णासाहेब दादू बनसोडे आणि प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक सिद्धार्थ अण्णासाहेब बनसोडे यांच्या सौजन्याने अखिल पिंपरी-चिंचवड कलामंचच्या वतीने दिवाळी पहाट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शहरातील स्थानिक कलाकारांनी एकत्र येत विविध कलाप्रकार सादर केले.
संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा भाग्यश्री (टिना) शर्मा घेवारे तसेच पदाधिकारी आणि सदस्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्राची लोकधारा, अभंग, भक्तिगीते, भावगीते, हिंदी व मराठी गाणी, लावणी, लोकगीते आणि काव्यरचना अशा विविध सादरीकरणांतून महाराष्ट्राच्या समृद्ध कला-संस्कृतीचे दर्शन घडले.
कार्यक्रमाचा उद्देश पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक कलाकारांना एकत्र आणणे, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि पुढील काळात अधिकाधिक संधी निर्माण करणे हा असल्याचे आयोजकांनी सांगितले. दिवाळीच्या मंगलमय वातावरणात आयोजित या कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणांसोबत फराळ वाटपही करण्यात आले.
या कार्यक्रमाला मुज्जफर इनामदार, आंतरराष्ट्रीय गायक चंद्रकांत पवार, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र जगताप, चित्रपट निर्माते सूर्यकांत पवार आणि कीर्तनकार पुरुषोत्तम हिंगणकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढल्याचे आयोजकांनी नमूद केले.
भाग्यश्री (टिना) शर्मा घेवारे यांनी आमदार अण्णा दादू बनसोडे हे शहरातील कलाकारांच्या पाठीशी सातत्याने उभे राहत असल्याचे सांगितले. कलाकारांना प्रोत्साहन, संधी आणि सहकार्य देण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कमी वेळेत हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉल्फिन्स गार्डन स्टुडिओ सांगवी हॉलचे राज सोमवंशी आणि त्यांच्या टीमचेही त्यांनी आभार मानले.
कार्यक्रमात गायन, वादन, लावणी आणि महाराष्ट्राची लोकधारा या सादरीकरणांना विशेष दाद मिळाली. विविध कलाकार, वादक, निवेदक आणि सहकाऱ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम रंगतदार झाला. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, कलाकार, पदाधिकारी, सदस्य, रसिक श्रोते तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.